लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम) : मातापित्याचे छत्र हरविलेले मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील रामेश्वर, ज्ञानेश्वर या मुलांच्या मदतीला वाशिम शहरातील अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत. शनिवारी सांयकाळी त्यांनी मुलांच्या घरी सहा महिन्याच्या धान्यासह २१ हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून दिली, तसेच या मुलांसह त्यांच्या दिव्यांग आजीआजोबांना नवे कपडेही दिले. सावरगाव येथील भुमीहिन शिवराम जाधव (४०) हे रोजमजुरी करून दिव्यांग आईवडिलांसह पत्नी आणि दोन मुलांचा सांभाळ करीत होते. अशातच १५ वर्षांपूर्वी मळणी यंत्रात त्यांना उजवा हात गमवावा लागला. त्यानंतर त्यांनी गुरे राखून कुटुंबाचा सांभाळ करीत असताना त्यांच्या पत्नी अरुणा जाधव यांना दुर्धर आजार जडला. पत्नीवर उपचार करीत कुटुंबाचा गाडा ते ओढत होेते; परंतु आठ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. ते दु:ख उरात दडवून त्यांनी रामेश्वर, ज्ञानेश्वरला सांभाळले; परंतु शनिवार १७ नोव्हेंबर रोजी शिवराम जाधव यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रामेश्वर, ज्ञानेश्वर पोरके झाले. या मुलांच्या मदतीसाठी प्रा. किशोर राठोड यांच्या संकल्पनेतून वाशिम येथील सुरेश राठोड कारभारी, अभियंता बी. एस. राठोड, डॉ. संदेश राठोड, डॉ. सुनील राठोड, डॉ. अजय राठोड, डॉ. सचिन पवार, अभियंता सेवाराम चव्हाण, अभियंता पुरुषोत्तम राठोड, अभियंता पी. के. चव्हाण, प्रा. डॉ. विपीन राठोड, प्रा. डॉ. विजय जाधव, प्रा. प्रेमसिंग राठोड, प्रा.व्ही. एम. राठोड, प्रा. विनोद राठोड, प्रा. संतोष राठोड, प्रदीप राठोड, तलाठी यू. पी. राठोड, विनोद चव्हाण, यू,आर. राठोड, किशोर राठोड, वाय. पी. राठोड, कमलसिंग राठोड, कैलास राठोड, संतोष जाधव, कैलास राठोड, कैलास पवार, संजय जाधव, रविंद्र जाधव, बी. एम. राठोड, सुभाष चव्हाण, आदिंनी जाधव परिवाराला आर्थिक मदत केली, तसेच सहा महिन्यांचे धान्य आणि कपडेही दिले. पुढेही ही मदत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनाथ मुलांच्या मदतीसाठी सरसावले अधिकारी, कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:03 PM