लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पर्यावरणविषयक जनसुनावणी कार्यक्रमात संतप्त ेशेतकऱ्यांनी प्रश्न मांडले असता, त्याला उत्तर न देता जिल्हाधिकाऱ्यांनी १० जुलै रोजी सभा आटोपली. यामुळे या कार्यक्रमात समृद्धी महामार्गाची प्रशंसा करीत नाट्यमय सरकारच्या बाजूने प्रश्न मांडणाऱ्या तोतया शेतकरी एनजीओस कार्यक्रम आटोपल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी बदडले.नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ९७.२२ किलोमीटर ५४ गावांतील महामार्गाकडे पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम व उपाययोजना यावर जनतेची मते जाणून घेण्यासाठी ५४ गावांतील संबंधित शेतकऱ्यांना कार्यक्रमात बोलावून पर्यावरणविषयक जनसुनावणी कार्यक्रम शेलुबाजार येथे १० जुलै रोजी बाजार समिती आवारात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी, तर प्रमुख उपस्थिती जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, रस्ते विकास मंडळाचे अधिकारी, प्रांत अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक संतप्त शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या विरोधात प्रश्न मांडले. मात्र, याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही. वनोजा परिसरातील शेतकऱ्यांनी शेवटी तीन प्रश्न मांडले. यामध्ये सर्व प्रथम आपल्या कार्यालयाकडून १६ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आली, त्यावर आपण हरकती मागविल्या. त्यानुसार ३० डिसेंबर २०१६ रोजी हरकती दाखल केल्या; परंतु या हरकतीवर कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही. त्यानंतर ८ मार्च २०१७ रोजी सामूहिक मोजणीची नोटिस दिली. नोटिस ९ मार्च २०१७ रोजी प्राप्त झाली. आम्ही ९ मार्च रोजी आक्षेप घेतला. मोजणीला शेतकऱ्याची संमती नसताना १३ मार्च २०१७ रोजी पोलीस बंदोबस्तात एकतर्फी मोजणी केली. ४ मे २०१७ रोजी नमुना ३ नुसार जमीन खासगी थेट खरेदी पद्धतीने घेण्याची सूचना जाहीर केली. त्यावर आम्ही मोजणी मान्य नसून, आमच्या समक्ष करण्यात आली नाही. त्यावर सुद्धा आम्ही २० मे २०१७ रोजी आक्षेप घेतला. त्यावर सुध्दा कार्यवाही नाही, असे तीन प्रश्न वनोजा व परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी मांडले, असता संबंधितांनी उत्तर न देता संतप्त शेतकऱ्यांचा जमाव पाहून सभा आटोपली. संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, या कार्यक्रमात नाट्यमयरीत्या समृद्धी महामार्गाची प्रशंसा करून सरकारच्या बाजूने पर्यावरणावर प्रश्न मांडणाऱ्या तोतया शेतकऱ्यांचा संतप्त शेतकऱ्यांनी शोध घेतला असता, रस्ते विकास महामंडळाच्या एनजीओ तोतया शेतकरी म्हणून प्रश्न मांडणाऱ्या एकास संतप्त शेतकऱ्यांनी बदडले. सदर कार्यक्रमात नाट्यमयरीत्या प्रश्न मांडणारे युवकाचा गट कार्यक्रम संपल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत भोजनाला मंगरुळपीर येथे विश्रामगृहात उपस्थित होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर न देताच अधिकाऱ्यांनी सभा गुंडाळली!
By admin | Published: July 11, 2017 1:55 AM