वाशिम: दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने ओखा-मदूराई-ओखा दरम्यान विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय २७ जून रोजी घेण्यात आला आहे. अकोला-पूर्णा मार्गावरील महत्वाचे आणि जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असतानाही वाशिम, हिंगोली या स्थानकावर गाडीला थांबा देण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून गाडी क्रमांक ०९५२० ओखा ते मदूराई विशेष रेल्वे १० ते ३१ जुलै या दरम्यान धावेल. ओखा येथून दर सोमवारी रात्री १० वाजता सुटून गुरुवारी सकाळी ११:४५ वाजता मदूराई येथे पोहचेल या गाडीचा ४ फेऱ्या होणार आहेत. तर गाडी क्रमांक ०९५१९ ही विशेष रेल्वे दर शुक्रवारी मदूराई येथून सकाळी(मध्यरात्र) १:१५ वाजता निघून तिसऱ्या दिवशी ओखा येथे रविवारी सकाळी १०:२० मिनिटांनी पोहचेल. या रेल्वेगाडीच्या देखील चार फेऱ्या होणार आहेत. द्वारका, जामनगर, सुरेंदनगर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, नंदूरबाद, भूसावळ, अकोला, पूर्णा, नांदेड, काचीगुडा, निजामाबाद, महेबुबनगर, रेनिगुटा, काटपाडी मार्गे मदूराई दरम्यान अप-डाऊन असा मार्ग राहणार आहे. अकोला-पूर्णा मार्गावरील महत्वपूर्ण स्थानक असलेले वाशिम, हिंगोली, वसमत स्थानकावर थांबा देण्यात आला नसल्याने हजारो प्रवाशांना या रेल्वेचा कोणताही उपयोग होणार नाही. त्यामुळे उपरोक्त स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक यांच्याकडे मागणी करण्यात आली असल्याची माहिती डीआरयूसीसी सदस्य महेंद्रसिंग गुलाटी यांनी दिली.
वाशिम मार्गे तांबरम-धनबाद विशेष गाडीची एक फेरीतामिळनाडू येथील तांबरम येथून झारखंड मधील धनबाद येथे जाण्याकरिता विशेष गाडी ची एक फेरी पूर्ण करण्यात येणार आहे, ही विशेष गाडी चेन्नई एग्मोर, गुंटूर, सिकंदराबाद, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, पंडित दिन दयाळ उपाध्याय जंक्शन, गया मार्गे धनबाद येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०६०७७ तांबरम – धनबाद विशेष गाडी तांबरम येथून ३० जूनला शुक्रवारी रात्री २२ वाजता सुटून शनिवारी रात्री ११:०३ वाजता वाशिमात पोहचून धनबाद येथे सोमवारी सकाळी ५ :३० वाजता पोहोचेल.