संतोष वानखडे, वाशिम : शनिवारी रात्रीपासून धो-धो बरसत असलेल्या पावसाचा जोर सोमवारी (दि.२) दुपारच्या सुमारास अधिकच वाढला. यामुळे पीक नुकसानाची व्याप्ती आणखी वाढण्याचा अंदाज असून, नदी-नाल्यांना पूर आल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूकही प्रभावित झाली होती.
जिल्ह्यात ३१ ऑगस्टच्या रात्री काही ठिकाणी संततधार पाऊस झाला. १ सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून, २ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास सार्वत्रिक स्वरुपात धो-धो पाऊस बरसला. पावसामुळे जवळपास २५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज असून, पावसामुळे पंचनाम्यातदेखील व्यत्यय निर्माण झाला. वाशिम तालुक्यातील केकतउमरा ते विळेगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक प्रभावित झाली होती.
आसोला जहाॅगीर (ता.वाशिम) येथील नदीलादेखील पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरातील नदी-नाले एक झाल्याने शेकडो एकरातील पिके पाण्याखाली सापडली. नाल्याला पूर आल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा ते बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर या मार्गावर असलेल्या पाचमोऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. मेडशी ते भौरद रस्त्यावरील अंधारसावंगी येथील लेंडी नाल्याला पूर आला होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती. पूर ओसरल्यानंतर वाहतूक सुरू झाली.