उघड्यावर शाैचास बसणाऱ्यांनी काढल्या उठाबशा
शिरपूर जैन : येथे २५ मार्च रोजी गुड मॉर्निंग पथकाने भेट देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या तिघांना उठाबशा काढायला लावल्या.
मोठा गाजावाजा, खर्च व प्रयत्न करून स्वच्छता मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली, तरी मात्र जिल्ह्यात कित्येक लोक उघड्यावर शौचास जात आहेत. परिणामत: हागणदारीमुक्त गाव मिशन यशस्वी होऊ शकले नाही. आजही गावाबाहेर ठिकठिकाणी लोक उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून पुन्हा गुड मॉर्निंग पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या गुड मॉर्निंग पथकांना २४ मार्च रोजी वाशिम जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी हिरवी झेंडी दाखविली.
२५ मार्च रोजी सकाळी सहा वाजता गुड मॉर्निंग पथक शिरपुरात दाखल झाले. या वेळी आठवडी बाजारात उघड्यावरच बसलेल्या व्यक्तीने गुड मॉर्निंग पथकाच्या गाडीवरील लाऊड स्पीकरचा आवाज ऐकून पळ काढला. तर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात उघड्यावर शौचास बसलेल्या काही लोकांनी पळ काढला. तर तिघा जणांना पथकातील विजय धागे व बाळू इंगोले यांनी उठाबशा काढायला लावल्या व पुन्हा उघड्यावर शौचास बसू नये, अशी समज दिली. अन्यथा बाराशे रुपये दंडाची कारवाईसुद्धा करण्यात येईल, असा इशारा दिला.