लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ई-पीक पाहणी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात २ लाख ७२ हजार ९८० खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत १ लाख ३ हजार ६८८ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ऑनलाईन नोंदणी केली आहे; तर १ लाख ६९ हजार ९८० शेतकरी अद्यापही नोंदणी प्रक्रियेपासून दूरच आहेत. अनेकांना हा विषयच कळलेला नसून ऑनलाईन प्रक्रियेविषयी काहीजण अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच नोंदणी वाढविण्यासाठी सुरू असलेला महसूल विभागाचा आटापिटा कुचकामी ठरत आहे.ई-पीक पाहणीमध्ये मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्वतः शेतातील पिकांची नोंद करू शकणार आहेत. त्यामुळे गावनिहाय पिकांची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे. शेतकरी प्रत्यक्ष शेतात जाऊन मोबाईल ॲपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतील, या ॲपमध्ये त्या क्षेत्राच्या अक्षांश व रेखांशाची नोंद होणार आहे. शेतकऱ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या माहितीची तलाठ्यांमार्फत पडताळणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. असे असले तरी अनेक गोरगरीब शेतकऱ्यांकडे अद्यापही ॲन्ड्राॅईड मोबाईल नाहीत, ते कसे हाताळायचे, याची जाण त्यांना नाही. ग्रामीण भागात मोबाईलच्या नेटला पुरेशी गती मिळत नाही. पिकांचे फोटो काढलेही जातील; मात्र ते मोबाईल ॲपव्दारे अपलोड कसे करायचे, या प्रश्नाने अनेक शेतकऱ्यांना ग्रासले आहे. त्यामुळे अद्याप १ लाख ६९ हजार ९८० शेतकरी नोंदणीपासून दूर असल्याचे बोलले जात आहे.
ई-पीक नोंदणीपासून दीड लाखांवर शेतकरी दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 11:42 AM