जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर या निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्यासह उमेदवारी माघार घेण्याची प्रक्रियाही पार पडली. जिल्ह्यातील निवडणूक होऊ घातलेल्या १६३ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्यानंतर आता १५२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या प्रक्रियेत शेतकरी बांधवांसह ग्रामीण भागातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात कारंजा बाजार समितीने गुरुवार, दि. १४ रोजी जाहीर सूचना दिली असून, या सूचनेनुसार शुक्रवार, दि. १५ जानेवारी रोजी बाजार समितीच्या यार्डवरील शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्णपण बंद राहणार आहे. शनिवार, दि.१६ जानेवारीपासून मात्र व्यवहार पूर्ववत सुरू केला जाणार आहे.
निवडणुकीसाठी शेतमाल खरेदी एक दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:33 AM