वाशिम/ शिरपूर जैन : येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नागपूर- औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील चांडस गावानजीक एका धाब्याजवळ पुणे येथून पुसदकडे जात असलेली खासगी बस उलटून भीषण अपघात झाला. ११ जून रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत वडगाव (ता. मानोरा) येथील एकजण जागीच ठार झाला. तर, अन्य सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. २९ एम. ८२८२ या क्रमांकाची खासगी बस प्रवाशी घेऊन पुणे येथून पुसदकडे चालली होती. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांडस गावानजीकच्या धाब्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यावर उलटून भीषण अपघात झाला. या घटनेत ५५ वर्षीय दिलीप साठे जागीच ठार झाले, तर निर्मला दिलीप साठे (रा. वडगाव), अजय देवराव साठे, आशा देवराव साठे, अलका सहदेव तेलंग (रा. लाडेगाव, ता. दारव्हा), गजानन सरकटे (रा. पुसद) हे सहाजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, संजय घुले घटनास्थळी हजर झाले. चांडस येथील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मालेगाव व वाशिम येथील दवाखान्यात पाठवण्यात आले. रस्त्यावर उलटलेली बस हटविण्यात आली. सदर बसमध्ये प्रवास करणारे पुसद भागातील कामगार असून ते ते पुणे येथून गावी परतत असताना अपघात झाला. या घटनेमुळे संबंधितांच्या गावात शोककळा पसरली आहे.