लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी (वाशिम) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अशोक गंगाराम देवकर (३५) रा. कोळदरा यांचा उपचारादरम्यान १३ नोव्हेंबरला मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा बालंबाल बचावला.कोळदरा येथील अशोक गंगाराम देवकर (३५) हे आपला मुलगा रोशन (१३) याला घेऊन एम.एच.३० ए .जे. ३१२० क्रमांकाच्या दुचाकीने १३ नोव्हेंबर रोजी मेडशीवरुन कोळदराकडे जात असतांना अकोला ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावरून मेडशीकडून पातूकडे जाणाºया अज्ञात वाहनाने सिमेंट पाईप फॅक्टरीजवळ देवकर यांचा दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये अशोक देवकर हे गंभीर जखमी झाले होते तर मुलगा रोशन याला किरकोळ मार लागला. उपचारार्थ त्यांना अकोला येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अशोक देवकर यांचा मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्डयात पडली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पितांबर जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुधाकर पवार यांच्या मार्गदर्शनात मालेगाव पोलीस करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 4:06 PM