लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्ग रोखण्याकरिता कॉण्टॅक्ट ट्रेसिंगसाठी, हॉटस्पॉट ओळखण्याबरोबरच नागरिकांना कोविडसंदर्भात आवश्यक ती माहिती देणाऱ्या ‘आरोग्य सेतू’ ॲपचा वापर जिल्ह्यातील एक लाख एक हजार ३९३ मोबाइलधारक करीत आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप विकसित केले आहे. याद्वारे नागरिकांना काही लक्षणे जाणवत असल्यास आवश्यक ती माहिती भरल्यानंतर आरोग्य विभागाच्या चमूद्वारे तपासणीही केली जाते. कोरोनाविषयक इत्यंभूत माहिती देणारे आरोग्य सेतू ॲप जिल्ह्यातील जास्तीत जास्त मोबाइलधारकांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले होते. त्यानुसार १०१३९३ मोबाइलधारक या ॲपचा वापर करीत आहेत.
आरोग्य सेतु ॲपद्वारे नागरिकांना कोरोनासंदर्भात इत्यंभूत माहिती मिळू शकते. प्रशासन व आरोग्य विभागालादेखील याद्वारे माहिती मिळते. जास्तीत जास्त नागरिकांनी या ॲपचा वापर करावा.- शण्मुगराजन एस., जिल्हाधिकारी