सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नाफेडच्यावतीने १0 जून २0१७ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ३ लाख २0 हजार क्विंटल तुरीच्या चुकार्यांपैकी १ कोटी २ लाख ८८ हजार रुपयांचे चुकारे अद्याप प्रलंबित असून, शासनाच्या निर्देशानुसार २१ जुलैपासून बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू झालेली तूर खरेदीदेखील उधारीवरच असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात गतवर्षीच्या रब्बी हंगामात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्या तुलनेत व्यापार्यांकडून अगदीच कमी दर मिळत असल्याची ओरड झाल्याने फेब्रुवारी २0१७ पासून शासनाने ५0५0 रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १0 जून २0१७ पर्यंत ३ लाख २0 हजार क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी करण्यात आली. मात्र, त्यानंतर शासनाने तूर स्वीकारणे बंद केले. दरम्यान, या तारखेपर्यंत १६१ कोटी ९५ लाख १८ हजार रुपये तुरीच्या चुकार्यापोटी शेतकर्यांना देणे बाकी होते. या रकमेपैकी १६0 कोटी ९२ लाख रुपये अदा करण्यात आले असून, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अद्याप शासनाकडून मिळणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, जुन्या तुरीचे चुकारे प्रलंबित असताना बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २१ जुलैपासून नव्याने सुरू करण्यात आलेली तूर खरेदीदेखील उधारीवरच सुरू असून, रोख पैसा हाती पडणे कठीण झाल्याने शेतकर्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकच ढासळत चालल्याचे दिसून येत आहे.
१0 जून २0१७ पुर्वीच्या तुरीच्या चुकार्याची प्रलंबित असलेली १ कोटी रुपयांची रक्कम मिळविण्यासंदर्भात शासनाकडे सलग पाठपुरावा सुरू आहे. ही रक्कम मिळताच संबंधित शेतकर्यांच्या खात्यात वळती केली जाईल.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम