रिसोड : तालुक्यातील कांदा बीज उत्पादक शेतकरी यावर्षी कांदा बियाण्याचे उत्पादन घटल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. यावर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात उत्पन्न देणारे पीक म्हणून कांदा बीज लागवड केली होती. परंतु, यावर्षीच्या खराब वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे बियांचे उत्पादन कमी आले. दरवर्षी एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन निघणारे कांदा बी यावर्षी केवळ २ क्विंटलपर्यंत निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात घट झाली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी हे विविध कंपन्यांशी करार करून कांदा बीज उत्पादन घेत असतात. गतवर्षी मोठ्या प्रमाणात बियाण्याचे दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर कांदा बियाण्याची लागवड केली होती. परंतु, कमी उत्पादनामुळे तसेच लागवडीला झालेल्या खर्चामुळे शेतकऱ्याला हे पीक यावर्षी फायदेशीर ठरले नाही.
कांदा बीज उत्पादन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:42 AM