लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे अद्याप वर्ग सुरू झाले नसून, आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत तर दुसरीकडे आॅनलाईन शिक्षणासाठी अद्याप ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने त्यांच्यापर्यंत आॅनलाईन शिक्षण पोहचले नाही. या विद्यार्थ्यांना आता १०, १० चे गट करून समुदाय पद्धतीने शिकविले जाणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळा बंद आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ३१ आॅगस्टपर्यंतही वर्ग सुरू होणार नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनादेखील आॅनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एकूण विद्यार्थी संख्या दोन लाख ६६ हजार ९४८ आहे. यापैकी अद्याप ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्राईड मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नाहीत तर १ लाख ९९ हजार ७६१ विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहे. ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन शिक्षण पोहचले नसल्याने, या बाबीची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. या विद्यार्थ्यांना दहा, दहाचे गट करून संबंधित शिक्षकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून शिकवावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या.दोन लाख ६६ हजार ९४८पैकी ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे साधने उपलब्ध नाहीत तर १ लाख ९९ हजार ७६१ विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहे. साधने उपलब्ध नसणाºया विद्यार्थ्यांना समुदाय पद्धतीने शिकविले जाईल.- अंबादास मानकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम
वाशिम जिल्ह्यातील ६७,१८७ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही ऑनलाईन शिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 11:26 AM