वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्यांची विक्री व्हावी यासाठी वाशिम जिल्ह्यातील ६७१२ शेतकऱ्यानी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ६५७ शेतकऱ्यांच्या १३ हजार ६०६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. दरम्यान, कारंजा येथे अद्याप शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले नाही.
कोणताही नवीन शेतमाल बाजारात विक्रीसाठी आला की बाजारभाव कोसळतात, याचा अनुभव दरवर्षी शेतकरी घेतात. यावर्षीदेखील नवीन हरभरा बाजारात विक्रीसाठी येताच, दर कोसळले. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीनुसार हरभऱ्याला दर मिळावे म्हणून जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपीर येथे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. हरभऱ्याला ४४०० रुपये असा हमीभाव आहे. ३ मे पर्यंत जिल्ह्यातील ६७१२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. वाशिम येथे १४६५ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ४७८ शेतकऱ्यांची १० हजार ६७९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. रिसोड येथे केवळ ७१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ४३ शेतकऱ्यांच्या ८०१ क्विंटल हरभऱ्यांची खरेदी करण्यात आली. मालेगाव येथे केवळ ५५१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ६७ शेतकºयांच्या ११०८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मानोरा येथे १०३१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ७ शेतकºयांच्या १४५ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मंगरूळपीर येथे केवळ २९३८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, ३ मे पर्यंत ६२ शेतकºयांच्या ८७१ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.कारंजा येथे ६५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, अद्याप येथे खरेदी केंद्र सुरू झाले नाही.