सोयाबीन कीड व्यवस्थापनाबाबत आयोजित प्रशिक्षणाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी केले. मार्गदर्शक म्हणून कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे उपस्थित होते. डॉ. रवींद्र काळे यांनी कमी खर्चाचे सोयाबीन पीक संरक्षण, तंत्रज्ञान याचा आगामी खरीप हंगामात अंगीकार करून उत्पादन खर्च कमी करीत उत्पन्न दुप्पट करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. तांत्रिक सत्रात कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी सोयाबीन पिकावरील विविध किडी व त्यांचे जीवनचक्र यावर प्रकाश टाकला, तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण करताना सोयाबीन पिकासाठी विविध कीड रोग प्रतिकारक वाण, कीड व रोगाच्या प्रतिबंधासाठी करावयाची बीजप्रक्रिया व विशेषत: सोयाबीन पिकावरील खोड माशीच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्व करावयाची बीजप्रक्रिया, सोयाबीन सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापन करण्याकरिता पक्षी थांबे, पाच टक्के निंबोळी अकार्चा वापर, कामगंध सापळ्यांचा वापर, पिवळा चिकट सापळ्यांचा वापर, सोयाबीन पिकातील विविध किडी करिता सर्वेक्षण व निरीक्षण घेण्याची पद्धत तसेच आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आधारित गरजेनुसार लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे कीडनाशकाचा संतुलित वापर याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे संगणक तज्ज्ञ श्रीकृष्ण बाविस्कर यांनी केले.
सोयाबीन एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:53 AM