मेडशी : येथे उमेद भरारी ग्रामसंघ व महिला किसान सशक्तीकरणांतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी गुरुवारी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.
यावेळी नागपूर येथून पंजाबराव कृषी विद्यापीठ येथील तज्ज्ञ गजानन मालवी, पूर्व पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व नागपूरचे मुख्य विपणन व्यवस्थापक सुनील पाटील यांनी मेडशी येथील शेतकरी महिलांशी लॅपटॉपच्या आधारे ऑनलाईन संवाद साधला. शेतकरी महिलांनी विचारलेल्या शेतीविषयक प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. यात पेरणीपूर्व मशागत कशी करावी, कोणती खते वापरावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मेडशी येथील बहुतांश लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे, परंतु, गेल्या काही दिवसांपासून शेती खर्चाच्या तुलनेत उत्पादन खूप कमी मिळत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय परवडणारा राहिलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जैविक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून उत्पादनात वाढ करतानाच निसर्गाचा कसा समतोल राखायचा, हे पटवून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुदेश वाईनदेशकर, राजेश कालापहाड व दीपक सोळंके यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तज्ज्ञ प्रशिक्षक प्रिया पाठक, कृषी सहायक विलास ढवळे व मेडशी येथील सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी अजिंक्य मेडशीकर उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला मेडशी व परिसरातील महिला शेतकरी जया घुगे, लता जाधव, संगीता रोठे, सुधा काकड, मनिषा घुगे, शोभा सोलनोर, संगीता साठे, ललिता तोडकर, रेणुका राठोड, मुन्नी बेनीवाले यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.