कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेचा कालावधी एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ अशा ११ महिन्याचा मानला जात आहे. त्यात सात हजारावर रुग्ण आढळले, तर त्यानंतर जिल्ह्यात संसर्गाची दुसरी लाट आली. ती तुलनेने गंभीर स्वरूपाची ठरली. या लाटेत बाधित आढळलेल्या रुग्णांचा आकडा ३५ हजारापेक्षा अधिक आहे. असे असले तरी ही लाटही आता पूर्णत: नियंत्रणात असून, गेल्या सात दिवसात केवळ ११ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत १० रुग्ण ‘ॲक्टिव्ह’ असून ते देखील लवकरच कोरोनातून बरे होतील, असा आशावाद जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी व्यक्त केला.
....................
जिल्ह्यात आज एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह
आरोग्य विभागाकडून शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात एक कोरोना बाधित रुग्ण आढळला. इतर पाच शहरे व ग्रामीण भागातील एकाही गावात आज बाधित रुग्ण आढळला नाही. यावरून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आजपर्यंत एकूण बाधितांचा आकडा ४१,७०५ वर पोहोचला आहे; तर त्यातील ६३८ जणांचा मृत्यू झाला असून, ४१ हजार ५६ जणांना ‘डिस्चार्ज’ मिळाला.