- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १०.१३ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ३.५३ लाख नागरिकांना पहिला डोस, तर १.१८ लाख नागरिकांना (११.६८ टक्के) लसीचा दुसरा डोस मिळाला. पहिल्या डोसनंतर विहित कालावधी पूर्ण होत असलेल्या जवळपास ९ हजार ६१२ नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. एप्रिल, २०२० ते जानेवारी, २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित ७,१४३ होते. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे, २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. दुसरी लाट ओसरत नाही; तेच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. ९ ऑगस्टपर्यंत तीन लाख ५३ हजार ३९२ नागरिकांना पहिला डोस तर एक लाख १८ हजार ३४१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. पहिल्या डोसनंतर विहित कालावधी पूर्ण झालेल्या जवळपास १५ हजार नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. दुसरा डोस घेण्याबाबत अनेक नागरिक अजूनही उदासीन असल्याचे दिसून येते
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. नागरिकांनीही स्वत:बरोबरच कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लस घ्यावी. लस ही पूर्णत: सुरक्षित व प्रभावी असून, कोणत्याही अफवा, गैरसमजावर विश्वास ठेवू नये. - डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.