लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १३१ लघू अशा एकूण १३४ धरणांमध्ये सद्य:स्थितीत केवळ तीन टक्के जलसाठा उरला आहे. दुसरीकडे शहरांसह ग्रामीण भागातील विहिरी आणि कुपनलिकांनीही तळ गाठल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी लावलेले टँकर भरायलाही अनेक ठिकाणी पाणीच मिळत नसल्याची बिकट स्थिती यामुळे उद्भवली आहे.जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात एकबुर्जी हा मध्यम प्रकल्प असून ३५ लघूप्रकल्प आहेत. त्यात आजमितीस केवळ १.५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम प्रकल्पासह २४ प्रकल्पांमध्ये १.७७ टक्के, कारंजा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पासह १७ प्रकल्पांमध्ये ८ टक्के पाणीसाठा असून मंगरूळपीर तालुक्यातील १५ लघूप्रकल्पांमध्ये १.३२ टक्के, रिसोडातील १८ प्रकल्पांमध्ये २.४७ टक्के आणि मानोरा तालुक्यातील २४ लघूप्रकल्पांमध्ये ४.२३ टक्के असा सरासरी तीन टक्क्यांच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला आहे.पाण्यासंदर्भातील स्थिती अत्यंत विदारक स्थितीत असताना अद्यापपर्यंत पावसाचाही थांगपत्ता नसल्याने अडचणींमध्ये भर पडली आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३५४ विहिरींचे अधिग्रहण केले असून १० गावांमधील ७ नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीची उपाययोजना करण्यात आली. यासह ५८ गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र अधिग्रहित करण्यात आलेल्या अधिकांश विहिरींची पाणीपातळीही खोलवर गेल्याने अनेक ठिकाणी टँकर भरायलाही पाणी मिळेनासे झाले आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर पोहचायलाही विलंब लागत असल्याची ओरड होत आहे. तथापि, आगामी काही दिवसांत मोठ्या स्वरूपातील तथा संततधार पावसाशिवाय उद्भवलेल्या या बिकट स्थितीवर मात करता येणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. १३४ पैकी ११३ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर!यंदा १६ जूनपर्यंतही पाऊस होण्याचे कुठलेच ठोस संकेत नसल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील लघू आणि मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांपैकी वाशिम तालुक्यातील ३२, मालेगाव तालुक्यातील २०, कारंजा तालुक्यातील १०, मंगरूळपीर तालुक्यातील १४, रिसोड तालुक्यातील १६ आणि मानोरा तालुक्यातील १८ अशा तब्बल ११३ प्रकल्पांची पाणीपातळी सद्या शून्यावर पोहचलेली असून उर्वरित प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती देखील चिंताजनक आहे.
वाशिम जिल्ह्यातील धरणांत केवळ ३ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 3:57 PM