लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सौर ऊर्जेवरील कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. वाशिम जिल्ह्यात १,३०० पंपांचे उद्दिष्ट असताना वर्षभरात केवळ ३१४ कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी २५ जून रोजी दिली. अपारंपरिक ऊर्जास्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत संपूर्ण राज्यात ७ हजार ५४० सौर कृषी पंप आस्थापित केले जाणार आहेत. त्यात वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी., असे एकंदरित १ हजार ३०० पंप आले आहेत. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जात आहेत. त्याकरिता शासनाकडून तब्बल ९५ टक्के अनुदान देय आहे, तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ८५ टक्के अनुदान दिले जाते. असे असताना जिल्ह्यात या योजनेला फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. २५ जूनपर्यंत या योजनेंतर्गत ४०० शेतकऱ्यांनी त्यांचा वाटा भरला असून, ३१४ शेतकऱ्यांना कृषी पंप देण्यात आले आहेत. उर्वरित ९०० पंपांसाठी मात्र लाभार्थी पुढे यायला तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
वर्षभरात कार्यान्वित झाले केवळ ३१४ सौर कृषी पंप!
By admin | Published: June 26, 2017 10:11 AM