वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेले १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळण्यासाठी आतापर्यंत केवळ ५२ ऑटोरिक्षामालकांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, या सर्वांच्या बँक खात्यावर अर्थसाहाय्य जमा करण्यात आले.
एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी केली होती. कडक निर्बंधांच्या कालावधीत परवानाधारक ऑटोमालकांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी परवानाधारक ऑटोरिक्षामालकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. गत १५ दिवसांत केवळ ६२ ऑटोरिक्षामालकांचे अर्ज प्राप्त झाले असून, सर्व ऑनलाइन अर्जांना मान्यता देण्यात आली. या ऑटोरिक्षामालकांच्या बँक खात्यावर १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात आले. जिल्ह्यात साडेतीन हजारांच्या आसपास परवानाधारक ऑटोरिक्षा असून, अर्थसाहाय्य योजनेसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. अर्थसाहाय्य योजनेचा अधिकाधिक परवानाधारक ऑटोरिक्षामालकांना लाभ मिळावा याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापनादेखील करण्यात आली आहे. ऑनलाइन माहिती भरताना काही अडचणी आल्यास किंवा आधार कार्ड हे मोबाइल क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी स्वतंत्र काऊंटर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील परवानाधारक ऑटोरिक्षा मालकांनी तात्काळ ऑनलाइन अर्ज सादर करून मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले.
......
बॉक्स
सुविधेसाठी विशेष कक्ष
अनेक ऑटोरिक्षा परवानाधारक चालकांना ऑनलाइन अर्ज करताना त्यांचे आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी संलग्न नसल्यामुळे ऑनलाइन अर्ज करता आले नाही. आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी संलग्न करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. ऑटोरिक्षा परवानाधारकांनी कार्यालयात उपस्थित होऊन आपले आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
00000000