लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे, तर दुसरीकडे हिवतापाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट आल्याचे दिलासादायक चित्र आहे. गत पाच वर्षांत केवळ ६५ रुग्ण आढळले असून, गतवर्षात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा हिवताप कार्यालयाच्या ठोस उपाययोजनांमुळे चार महिन्यांतही हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
थंडी वाजून ताप येणे, डोके दुखणे, एक दिवसाआड परत-परत ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे आदी लक्षणे आढळून आली की शक्यतोवर ती मलेरियाची (हिवताप) समजली जातात. मागील पाच वर्षांत ठोस उपाययोजना व उपचारामुळे जिल्ह्यात हिवताप रुग्णांची संख्या हळूहळू खाली आली आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी हीच संख्या शेकडोंच्या संख्येने होती. गत पाच वर्षांत जिल्ह्यात केवळ ६५ रुग्ण आढळून आले आहेत, तर मागील चार महिन्यांत हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. राज्य स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यास २०१५च्या हिवताप रुग्णसंख्येवरून हिवतापाचे दुरीकरण व हिवतापाचे समूळ उच्चाटन ठराविक कालावधीत करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यानुुसार वाशिम जिल्ह्यास २०२५ पर्यंत हिवताप दुरीकरण करणे व हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. निदान तत्पर..उपचार सत्वर..या ब्रीदवाक्यानुसार संशयित हिवताप रुग्णाचे रक्त नमुने घेऊन त्याची त्वरित तपासणी करून त्याच दिवशी उपचारास सुरुवात केली जाते. जिल्ह्यात मलेरियाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासादायक चित्र आहे.
०००
बॉक्स
‘नको डास, नको हिवताप’
१) आपल्या घराभोवती, परिसरात पाणी साठू देऊ नका. २) डबकी बुजवा किंवा वाहती करा. ३) साठवलेल्या पाण्यावर थोडेसे रॉकेल टाका, त्यामुळे डासांच्या अळ्यांचा नाश होतो. ४) डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे डबक्यात सोडा. ५) सरकारी दवाखान्यातील गप्पी मासे पैदास केंद्रात गप्पी मासे उपलब्ध असतात. ६) झोपताना मच्छरदाणी वापरा. ७) घराच्या खिडक्यांना बारीक जाळी बसवा. ८) हात, पाय झाकले जातील असे अंगभर कपडे वापरा. ९) आवश्यक तेथे डास प्रतिबंधक अगरबत्तीचा वापर करा. १०) कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका.
०००
कोट
गत काही वर्षांत मलेरिया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल सुरू आहे. गतवर्षी एकही रुग्ण आढळून आला नाही. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे परिश्रम व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे.
- डॉ. प्रसाद शिंदे
जिल्हा हिवताप अधिकारी
०००
बॉक्स
११ लाखांवर तपासणींची नोंद
सन २०१६ मध्ये २,२०,८९३ ताप रुग्णाचे रक्तनमुने घेण्यात आले. सन २०१७ मध्ये २,२३,५८६, सन २०१८ मध्ये २,३६,२४६, सन २०१९ मध्ये २,३६,४५२ आणि सन २०२० मध्ये १,२८,०१९ तापरुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले. या पाच वर्षांत ६५ हिवताप दूषित रुग्ण आढळून आले. त्या सर्व हिवताप दूषित रुग्णांना समूळ उपचार करण्यात आला आहे.
००
जिल्ह्यातील मागील पाच वर्षांची हिवताप रुग्णसंख्या
२०१६ ३७
२०१७ १२
२०१८ ११
२०१९ ५
२०२० ०