वाशिम : राज्य शासनाने निर्बंध कठोर करतानाच दारिद्र्यरेषेखालील, तसेच प्राधान्य गटातील कुटुंबाला एका महिन्यासाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्याच्या निर्णयानुसार, जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना १ मेपासून रेशनच्या मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. ‘ई-पॉस’वर केवळ दुकानदारांचाच अंगठा घेऊन लाभार्थींना धान्य वाटप असल्याने, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टळणार असल्याचे बोलले जात आहे.
गतवर्षी लॉकडाऊनदरम्यान अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थींना मोफत धान्याचा लाभ देण्यात आला होता. यंदाही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने संचारबंदीचे निर्बंध आणखी कठोर केले आहेत. या दरम्यान, गोरगरीब लाभार्थींना दिलासा म्हणून रेशनचे धान्य एका महिन्यासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदयचे ४८ हजार ९७० आणि प्राधान्य गटातील एक लाख ८१ हजार १०९ अशा एकूण दोन लाख ३० हजार ७९ कुटुंबांना मिळणार आहे. जिल्ह्यात मोफत धान्य प्राप्त झाले असून, ऑनलाइन नोंद घेण्यात आली आहे. उपलब्ध सुविधेनुसार रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचविण्यात येत आहे. ज्या दुकानांमध्ये धान्य पोहोचले तेथे वाटप सुरू झाला. पुढील दोन महिने ‘ई-पॉस’वर केवळ संबंधित दुकानदाराचा अंगठा घेऊन लाभार्थींना धान्य वाटप होणार असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता कमीच आहे. या संदर्भातील सूचना पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत.
०००
कार्डधारकांची संख्या २,७८,१५०
अंत्योदय ४८,९७०
प्राधान्य कुटुंब १,८१,१०९
केशरी १४,७३९
००००००००००००००००
सॅनिटायझरचा खर्च कुणी करावा?
रेशन दुकानांमध्ये सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र, सॅनिटायझरचा खर्च कुणी करावा? हा पेच कायम आहे तूर्तास दुकानदारांच्या पातळीवर सॅनिटायझरचा खर्च केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोेरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. रेशन दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात येत आहे, असे रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर काळे यांनी सांगितले.
लाभार्थींनीही मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन करण्यात आले.
००००००००
विमा संरक्षण देण्याची मागणी
कोरोनामुळे दुकानदारांच्या कुटुंबीयास आर्थिक संरक्षण म्हणून ५० लाखांचे विमा संरक्षण मिळावे. कोरोनामुळे एखाद्या दुकानदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी रेशन दुकानदार संघटनेची मागणी आहे.
०००००००००
काही ठिकाणी धान्याची प्रतीक्षा
जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचले नाही. येत्या चार, पाच दिवसांत सर्व ठिकाणी धान्य पोहोचेल, असे सांगण्यात येत आहे.
०००
कोट
जिल्ह्यात पात्र लाभार्थींना मोफत धान्य वितरण सुरू झाले आहे. कोरोनामुळे ‘ई-पास’वर केवळ दुकानदारांचाच अंगठा घेऊन लाभार्थींना धान्यवाटप करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
- सुनील विंचनकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम