लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी साधारणत: १५ जूनपासून जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात होत असल्याचा पुर्वेतिहास आहे. यंदा मात्र जुलैचा पहिला आठवडा सुरू होवूनही बहुतांश ठिकाणी काही तासांचा अपवाद वगळता मोठा पाऊस अद्यापपर्यंत झालाच नाही. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोसळलेला एकूण पाऊस ११.६२ टक्के असून गेल्या ६ दिवसांत ६ टक्केच पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात घट झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा होऊ शकला नाही. तसेच चालूवर्षीच्या उन्हाळ्यात तापमानाने ४५ ते ४६ अंशाचा टप्पा ओलांडल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून धरणांनी तळ गाठला. दुसरीकडे विहिरी, हातपंप, कुपनलिका या जलस्त्रोतांची पाणीपातळीही खोलवर गेल्याने जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विहिर अधिग्रहण, टँकरच्या माध्यमातून प्रयत्न केले. दरम्यान, जून महिन्यापासून दमदार पावसाला सुरूवात होवून उद्भवलेली पाणीटंचाईची बिकट समस्या निकाली निघण्याची शक्यता वर्तविली जात असताना अद्यापपर्यंत अपेक्षित पावसाला सुरूवातच झाली नसल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात २५ जूनपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या ५.३५ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर २९ जूनला घेण्यात आलेल्या नोंदीनुसार पावसाची टक्केवारी ११.४४ होती. ३० जूनला ती काहीअंशी सरकून ११.५६ टक्के झाली; तर १ जुलैच्या नोंदीनुसार आतापर्यंत ११.६२ टक्के पाऊस झाला आहे. यावरून गेल्या ६ दिवसात केवळ ६ टक्के पाऊस कोसळल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. ही विदारक स्थिती अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यात काहीठिकाणी झालेल्या पेरण्या उलटण्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्न देखील गंभीर स्वरूप धारण करणार असल्याची शक्यता जाणकारांमधून वर्तविण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात ६ दिवसात केवळ ६ टक्के पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 2:58 PM