लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शालेय शिक्षण विभागातील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन ‘आॅनलाईन’ पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाकडून शालार्थ वेतन प्रणाली अंमलात आली. मात्र, विविध स्वरूपातील अडचणींमुळे जानेवारी २०१८ पासून बंद असलेली ही प्रणाली आता पुन्हा सुरू झाली असून कर्मचारी अटॅच, डिटॅच करणे आणि विविध कारणांमुळे शिक्षकांची सेवा समाप्त झाल्यास तशी माहिती सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्याची अंतीम मुदत १७ मे असून विहित नमुन्यात माहिती भरताना मुख्याध्यापकांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे. वाशिम येथील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षक ए.यू. कदम यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे, की जानेवारी २०१८ पासून काही तांत्रीक अडचणींमुळे शालार्थ प्रणालीचे काम बंद होते. ही प्रणाली पुर्ववत सुरू करण्याचे काम ‘महा-आय टी’कडे सोपविण्यात आले असून तांत्रीक अडचणी दूर झाल्या आहेत. सद्या शालार्थ प्रणालीमध्ये आॅगस्ट २०१७ पर्यंत माहिती उपलब्ध आहे. दरम्यान, आयुक्तांच्या आदेशानुसार बदली, समायोजन, पदोन्नती मिळालेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांना अटॅच अथवा डिटॅच करणे आणि सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती, मयत कर्मचाºयांची सेवा शालार्थ प्रणालीतून समाप्त करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. त्यानुसार, शालार्थ प्रणालीत संबंधित दोन टॅब कार्यान्वित करण्यात आले असून १० मे ते १७ मे या कालावधीत सदर माहिती भरून सादर करावयाची आहे, असे वेतन पथक अधीक्षकांनी कळविले.दरम्यान, शालार्थ प्रणालीमध्ये आॅगस्ट २०१७ पर्यंतचीच माहिती भरण्यात आलेली असल्याने त्यापुढे २१ महिन्यांमध्ये झालेले बदल अद्ययावत करून विहित नमुन्यात माहिती भरताना सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांची पुरती तारांबळ उडत असून उन्हाळ्याच्या सुट्यांवर बहुतांशी पाणी फेरले गेल्याचा सूर काही मुख्याध्यापकांमधून उमटत आहे.डीडीओ-२ च्या मान्यतेशिवाय कार्यवाही अपूर्णशाळास्तरावर डीडीओ-१ अर्थात मुख्याध्यापकांनी शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचारी ‘अटॅच-डिटॅच’ करणे आणि ‘सर्व्हिस एन्ड’बाबतची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करून अंतीम मंजूरीकरिता अहवाल डीडीओ-२ अर्थात वेतन पथक, माध्यमिक यांच्याकडे पाठवून मान्यता घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय केलेली कार्यवाही पूर्ण होणार नाही. यासंदर्भात वेतन पथक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना, प्राचार्यांना यापूर्वीच पत्र पाठवून सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन ‘टॅब’ व्यतिरिक्त कुठलीही कार्यवाही न करण्याचे निर्देश शालार्थ प्रणालीमध्ये केवळ कर्मचारी ‘अटॅच-डिटॅच’ करणे आणि ‘सर्व्हिस एन्ड’बाबतची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करणे हे दोन ‘टॅब’च कार्यान्वित करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त प्रणालीत इतर कुठलीही कार्यवाही करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
शालार्थ प्रणाली; कार्यवाहीचे अहवाल सादर करण्यास उरले तीन दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 4:03 PM