------
रिठद येथे हरभरा पिकाची पाहणी
रिठद : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे रब्बी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात हरभरा पिकावर घाटेअळीसह मररोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कावश्री घोलप यांच्या सूचनेनुसार कृषी सहायकांनी शिवारात फेरी मारून हरभरा पिकाची पाहणी शुक्रवारी केली व किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
-------------------------
वीजखांबावर वाहिनीची जोडणी
इंझोरी : मानोरा तालुक्यातील इंझोरी गावलगत नव्या वस्तीत जुलै महिन्यात महावितरणने वीजखांबांची उभारणी केली; परंतु त्यावर वीजवाहिनीच न टाकल्याने ग्रामस्थांना वीजजोडणी मिळणे कठीण होते. याबाबत ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर महावितरणने गुरुवारी काही भागांतील खांबावर वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले.
----------------
नव्या रोहित्राचे काम पूर्ण
आसेगाव : येथील वीज उपकेंद्रांतर्गत वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी महावितरणकडून वाढीव रोहित्रांचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले हे काम पूर्ण झाले असून, नवे रोहित्र बसविण्यात आल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या त्रासापासून ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
------------------
नाल्यांची साफसफाई, ग्रामस्थांना दिलासा
दगड उमरा : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथे अनेक दिवसांपासून नाल्यांची साफसफाई न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्यानंतर गुरुवारपासून गावातील नाल्यांची सफाई करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात आली.
-------
पोलीस चौकीत ग्रामस्थांना मार्गदर्शन
कामरगाव : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामरगाव पोलीस चौकीत धनज बु. पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांनी ग्रामस्थांची सभा घेऊन परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्यासह पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. निवडणूक असलेल्या गावांतही त्यांनी सभा घेतली.