वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात गुड मॉर्निंग पथक गठित झाले असून, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्ध पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईची मोहीम जिल्हा स्वच्छता विभागाने हाती घेतली आहे.वाशिम जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झालेला आहे. तथापि, हागणदरीमुक्त गावांत उघड्यावर शौचवारीचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात मध्यंतरी गुड मॉर्निंग पथकाची कारवाई ठप्प झाली होती. कारवाईची मोहिम नसल्याने नागरीकही मोठ्या संख्येने उघड्यावर शाैचास जातात. ग्रामीण भागात अनेकजण उघड्यावर शौचास जात असल्याचे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे. यावर नियंत्रणासाठी वाशिम जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छता निगराणी समिती नियुक्त करण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना १ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार गावोगावी ग्राम स्वच्छता निगरानी समिती स्थापन केली जात आहे. उघड्यावर शौचास जाताना गुड मॉर्निंग पथक तसेच स्वच्छता निगरानी समितीच्या निदर्शनात आल्यास ५०० रुपयांपेक्षा अधिक दंड आकारण्यात येणार आहे. यानंतरी संबंधित व्यक्ती उघड्यावर शौचास जाताना आढळून आला तर वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हा स्वच्छता कक्षाने सोमवारी दिला. स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.
उघड्यावरील शौचवारी पडणार महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 2:08 PM