कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट अती तीव्र स्वरूपाची ठरली. दरम्यान, संसर्गावर नियंत्रण मिळविण्याकरिता तथा होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने बाजारपेठेसह सर्वधर्मीयांची मंदिरेही कुलूपबंद ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भाविक देवाच्या दर्शनापासून वंचित आहेत. महाप्रसादाचे कार्यक्रमही ठप्प आहेत. तथापि, कोरोना संसर्गाची व्याप्ती आता कमी झाल्याने मंदिरे सुरू करण्यासंबंधी प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
.................
किती दिवस कळसाचेच दर्शन?
कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेत अनेक महिने मंदिरे बंद राहिली. यामुळे देवाचे जवळून दर्शन घेता आले नाही. आता कोरोनाचे संकट जवळपास संपुष्टात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने मंदिरे खुली करण्याचे आदेश द्यायला हवे.
- वैशाली राजेश कडू
...................
कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताच शासनाने संपूर्ण व्यापारपेठ खुली केली. बॅंका, एसटी वाहतूक, दारूची दुकाने खुली झाली असून, प्रत्येक ठिकाणी गर्दी होत आहे. केवळ मंदिरे बंद ठेवून शासनाला काय साध्य करायचेय कळत नाही.
- राम पाटील
............
कोरोनाच्या संकटापूर्वी संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर भाविकांनी सदैव फुलून राहायचे. सकाळ-सायंकाळच्या आरतीला भाविक हजेरी लावायचे. दर गुरुवारी संस्थानमध्ये महाप्रसाद व्हायचा. कोरोना काळात मात्र या सर्व विधींवर निर्बंध लादले गेले. आता ते शिथिल केले जावेत, अशी अपेक्षा आहे. नियमांचे सर्वतोपरी पालन केले जाईल.
- देविदास कोरान्ने, पुजारी
................
आर्थिक गणित कोलमडले
कोरोना संसर्गाच्या संकट काळात मंदिरे कडकडीत बंद राहिली. त्यामुळे पूजेचे साहित्य, श्रीफळ, अगरबत्तीचा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. कोरोनाचे संकट आता परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे मंदिरे खुली व्हायला हवी.
- परमेश्वर शर्मा
............
वाशिममध्ये श्री बालासाहेब संस्थान, संत गजानन महाराज मंदिरासह इतरही विविध मंदिरे आहेत. ठराविक त्या-त्या दिवशी देवाला चढविण्यासाठी पुष्पमालांची मागणी होते. मात्र, कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असून, आर्थिक गणित कोलमडले आहे.
- रामा इंगळे, फुले विक्रेता