लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी खुला प्लाॅट घेतला जातो; मात्र तो सांभाळणे गेल्या काही वर्षांत कठीण झाले आहे. खुल्या प्लाॅटवर कोण, कधी ताबा करून हडपेल काहीच सांगता येत नाही. गेल्या वर्षभरात अशाप्रकारे प्लाॅट हडपल्याच्या नऊ तक्रारी झाल्या.खुल्या प्लाॅटवर अनधिकृत पद्धतीने ताबा केल्यानंतर मूळ मालकाने तक्रार केल्यास ताबा सोडण्यासाठी चक्क पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारींची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे मोकळा प्लाॅट सांभाळणे कठीण बाब झाली असून मूळ मालकांना प्लाॅटच्या चारही बाजूंनी अतिक्रमण करू नये, असा फलक लावावा लागत आहे.
एकच प्लाॅट अनेकांना विकलावाशिम शहरातील काही भागात एकच प्लाॅट अनेकांना विकल्याचा प्रकार यापुर्वी घडलेला आहे. यासंदर्भात गेल्या दोन वर्षांत वाशिम नगर परिषदेकडे मूळ मालकांनी तक्रार दाखल केली; मात्र या धंद्यात पारंगत असलेल्या भूखंड माफियांनी घालून ठेवलेल्या गोंधळामुळे अनेकांना न्याय मिळालेला नाही.
प्लाॅट असल्यास ही घ्या काळजी प्लाॅटची खरेदी झाल्यानंतर तत्काळ त्यास सिमेंटचे खंबे गाडून तार कुंपन करून घेणे आवश्यक ठरत आहे. यासह पक्की नोंदणी करणेही गरजेचे ठरत आहे. याशिवाय प्लाॅटच्या चारही बाजूंनी ठळक अक्षरात मूळ मालकाचे नाव आणि प्लाॅटवर कोणीही अतिक्रमण करू नये, असा मजकूर नमूद असलेला फलक लावल्यास चुकीच्या प्रकारांना बहुतांशी आळा बसू शकतो, असे वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी सांगितले.
प्लाॅट परस्पर हडपण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत. यासंदर्भात तक्रार झाल्यास संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केला जातो. प्लाॅटच्या मूळ मालकांनीही सतर्क राहायला हवे.- धृवास बावनकर, ठाणेदार, वाशिम
प्लाॅट खरेदीसाठी लाखो रुपये गुंतविल्यानंतर प्लाॅटचा सांभाळ करणेही गरजेचे आहे. त्यानुषंगाने पक्की नोंदणी करून घेणे, प्लाॅटला तार कुंपन करणे, त्याठिकाणी मूळ मालकांच्या नावाचा फलक लावणे अशा काही महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष पुरवायला हवे.- विजय साळवे, तहसीलदार, वाशिम