मंगरूळपीर : तालुक्यातील रेती तस्करांनी परत डोके वर काढले असून, महसूल विभागाने तीन ट्रकवर कारवाई केली आहे. तालुक्यातील अडाण - मडान नदी पात्रासह इतर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांमधून रेतीचा खुलेआम उपसा होत आहे. यामुळे शासनाचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून रेतीची तस्करी होत असून, आता रात्रीच्या अंधारात नव्हे तर दिवसाढवळ्या हे तस्कर नदी नाल्यांमधून ही तस्करी हाेत असल्याचे चित्र सध्या मंगरूळपीर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ टाकून या तस्करांनी स्वतःचे रेती घाट तयार केले असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. सध्या महसूल विभागाने अवैध गौण खनिजावर बंदी घातली आहे. काही महिन्याअगोदर येथील महसूल विभागाने तालुक्यातील काही रेती तस्करांचे ट्रॅक्टर पकडून त्यांना लाखो रुपयांचा दंड केला होता. मात्र, आता मंगरूळपीर तालुक्यातील रेती तस्करांनी रेतीचा उपसा सुरू केल्याने महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मंगरूळपीर येथील काही रेती तस्करांनी रेतीचे घाटच तयार केल्याची माहिती आहे. या रेती घाटातून रात्रीच्या सुमारास व दिवसा रेतीची खुलेआम तस्करी केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यातील रेती तस्करी होत आहे. याबाबतची माहिती महसूल विभागाला कशी नाही. याकडे महसूल विभागाचे त्या परिसरातील कर्मचारी दुर्लक्ष तर करीत नाहीत, असाही सवाल तालुक्यातील ग्रामस्थ करीत आहेत. रेती तस्करांनी नदी पात्रात मोठमोठे खड्डे तयार केले आहेत आणि त्यामधून अवैध उपसा केला जात असल्याची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी येथील रेती तस्करीचे प्रकरण राज्यभर गाजले होते. तरीसुद्धा पुन्हा एकदा तालुक्यात जोमाने वाळू तस्करी होत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे. अनेक रेती तस्कर हे विविध राजकीय पक्षांचे लेबल लावून हा धंदा करीत असल्याची चर्चा आहे. या आठवड्यात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एका ट्रकला १ लाख ४५ हजार, तर दुसऱ्याला १ लाख ४ हजार दंड करण्यात आला आहे. तर २५ फेब्रुवारी रोजी पकडलेल्या ट्रकलासुद्धा दीड लाख रुपये दंड होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच अनेक दिवसांपासून गिट्टीच्या चुरीचे वाहनसुध्दा तहसील कार्यालयात लावलेले असून, याला सव्वा दोन लाख रुपये दंड करण्यात आला असता अपील केल्याने सध्या सुनावणी सुरू आहे.