वाशिम : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो तांदूळ दिला जाणार आहे. जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार असून जिल्ह्यातील २७ हजार ७३६ शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत सहभागी नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. रास्त भाव दुकानदारांनी प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम (फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड) या तत्त्वानुसार धान्य वितरण करावे. लाभार्थ्यांना याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विंचनकर यांनी केले.
००
नोंदवहीमध्ये संपूर्ण तपशिलाची नोंद
शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करताना रास्त भाव दुकानदारांनी त्या शिधापत्रिकेचा क्रमांक व त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील संपूर्ण तपशील, याची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी विंचनकर यांनी दिल्या.
त्या नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्यांची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्या ग्राहकास रीतसर पावती द्यावी. या अन्नधान्यवाटपात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही, याची दक्षता रास्त भाव दुकानदारांनी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.