शिरपूर जैन: यंदा जाणवणाºया पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले. या संदर्भात वाशिम लघू पाटबंधारे विभागाने ११ आॅक्टोबर रोजी लिखित आदेशही जारी केले. त्यानुसार अडोळ प्रकल्पातील सिंचनासाठी होणारा उपसा थांबविण्याचे काम विज वितरणला करायवायचे होते; परंतु सदर आदेशाचे पत्रच विज वितरणला चक्क १२ दिवसांनी उशिरा प्राप्त झाले. या कालावधित आधीच तळ गाठलेल्या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर शेतीसाठी झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे.
यंदा अल्प पावसामुळे जलप्रकल्पांनी तळ गाठला असताना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाचाही समावेश आहे. अडोळ प्रकल्पातून रिसोड, शिरपूर, रिठद, वाघी, शेलगाव आदि गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत या प्रकल्पात २० टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. त्यातच या प्रकल्पातून सिंचनासाठी होत असलेला उपसा आणि वाढत्या उष्म्यामुळे प्रकल्पातील पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे जनतेला पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन लूघ पाटबंधारे विभाग वाशिम यांनी अडोळ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पातून सिंचनासाठी होत असलेला पाणी उपसा थांबविण्यासाठी विज जोडण्या खंडीत करण्याच्या सूचना देणारे पत्र विज वितरणच्या नावे काढले; परंतु ११ आॅक्टोबर रोजी काढलेले हे पत्र विज वितरणला चक्क १२ दिवसांनंतर प्राप्त झाले. या १२ दिवसांच्या कालावधित सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने प्रकल्पातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे काही दिवस टाळता येणारी पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. प्रशासनाच्या गोंधळामुळेच हा प्रकार घडला आहे.