लोकमत न्यूज नेटवर्कधनज : कारंजा लाड तालुक्यामधील लाडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी तथा ‘गंगा शेतकरी, शेतमजूर बचतगट लाडेगाव’चे अध्यक्ष श्याम रामदास सवाई यांनी केवळ प्रयोगातून सुरुवात केलेल्या सेेंद्रिय गहू पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली असून, त्यांचा हा गहू आता सातासमुद्रापार दुबईत पोहोचला आहे.श्याम रामदास सवाई यांनी यावर्षी त्यांच्या शेतात प्रयोग म्हणून सेंद्रिय पद्धतीने गहू या पिकाची पेरणी केली होती. या पिकाचे भरघोस उत्पन्न त्यांना मिळाले. त्यानंतर गंगा गृहोद्योग गटाच्या माध्यमातून त्यांनी या पिकाचा ‘खपली गहू’ असा ब्रॅण्ड तयार करून नवी ओळख निर्माण केली. त्यांचा हा प्रयोग एवढा यशस्वी झाला की, आता या पौष्टिक गव्हाच्या खरेदीसाठी देशभरातून मागणी येत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा गहू एसटीच्या मालवाहतुकीद्वारे मुंबईला आणि मुंबईहून विमान वाहतुकीने थेट दुबईला रवाना केला. मूळचे कारंजा लाड येथील आणि सध्या दुबई येथे स्थायिक होत मसालाकिंग म्हणून ओळख निर्माण केलेले उद्योजक डॉ. धनजंय दातार यांनी शेतकरी आणि उत्पादित शेती मालाला प्रोत्साहन देण्यासाठी श्याम सवाई यांनी उत्पादित केलेल्या गव्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
सामान्य गव्हापेक्षा पौष्टिक खपली गव्हामध्ये इतर गव्हाच्या तुलनेत ६० टक्के अधिक लोहसत्त्व असते. सोबतच प्रोटीन, स्टार्चसारखे दुसरे पोषक तत्त्वदेखील आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा गहू शुगर फ्रीदेखील आहे. ग्लूटेन फ्री, डायबेटिक फ्रेंडली तसेच प्रोटीन्स १०-१२ टक्के, फायबर्स १४-१६ टक्के, कमी कॉलेस्ट्रॉल पातळी अशी या गव्हाची वैशिष्ट्ये आहेत. या गव्हाच्या सेवनामुळे आम्लपित्ताच्या आजारावर नियंत्रण राहते. खाण्यास अत्यंत चवदार आणि पचन क्रियेस सुलभ असा हा गहू आहे.
लाडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्याम सवाई यांनी सेंद्रिय पद्धतीने गहू पिकाचे उत्पादन घेत खपली ब्रॅण्ड म्हणून गव्हाची ओळख निर्माण केली आहे. हा गहू त्यांनी दुबई येथे पाठविला असून, इतर गव्हाच्या तुलनेत हा गहू स्वादिष्ट आणि पौष्टिक असल्याने त्याला मागणी वाढत आहे.-संतोष वाळके,तालुका कृषी अधिकारी, कारंजा