वाशिम : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून १५ ते ३० जुलै २०२१ या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यात राबविण्यात येत असून, या अंतर्गत ५ वर्षांच्या आतील बालकांना घरोघरी जाऊन ओआरएसची पाकिटे व झिंक गोळ्यांचे वाटप केले जात आहे.
पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे एक प्रमुख कारण आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी घेतला असून, जिल्ह्यातील ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना अतिसार होणार नाही, यासाठी ओआरएसची पाकिटे व झिंक गोळ्यांचा औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावा. ५ वर्षांच्या आतील बालकांना घरोघरी जाऊन ओआरएसची पाकिटे व झिंक गोळ्या आरोग्य विभागाने आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात आशा कार्यकर्तींच्या माध्यमातून पाच वर्षांच्या आतील सर्व बालकांच्या घरी ओआरएसची पाकिटे तसेच झिंक गोळ्यासुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आशा कार्यकर्ती ही गृहभेटीतून ओआरएस व गोळ्या वाटप करीत असून, हे वापराबाबत पालकांचे समुपदेशन, प्रात्याक्षिके व उपचार करीत असल्याचे डॉ. आहेर यांनी स्पष्ट केले.