वाशिम: 'आमच गाव, आमचा विकास' या अभियानांतर्गत १३ मार्च रोजी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामपंचायत कार्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या विकास कामांच्या आराखड्याबाबत या कार्यशाळेत चर्चा आणि मार्गदर्शन होणार होते. यासाठी प्रशिक्षिकाही आल्या होत्या; परंतु यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांसह सचिवांचीच उपस्थिती नसल्याने कुलूपबंद ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक तास ताटकळत बसूनही कोणीच उपस्थित न झाल्याने त्यांना निराश होऊन परत जावे लागले.
पार्डी ताड येथे आमच गाव, आमचा विकास या मोहिमेंतर्गत ४ जुलै २०१७ ते ७ जुलै २०१६ या कालावधित गावातील विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार २०१६ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधित ग्रामपंचायतीसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर निधीतून करण्याच्या कामांचे नियोजन झाले होते. आता या आराखड्यानुसार गावांत किती कामे करण्यात आलीत, कामे केली की नाहीत, याची पडताळणी करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह सदस्य आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी १३ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होेते. या कार्यशाळेसाठी प्रविण प्रशिक्षिका प्रतिभा गावंडे या पार्डी ताड येथे आल्या. त्यावेळी त्यांना ग्रामसचिव आणि पदाधिकाºयांची उपस्थिती अपेक्षीत होती; परंतु ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद असल्याचे त्यांनी दिसून आले. सचिवांच्या दुर्लक्षीत कारभारामुळे हा सर्व प्रकार घडला आणि आमच गाव, आमचा विकास या अभियानाचे एक दिवसीय प्रशिक्षण होऊ शकले नाही. ग्रामसचिव सतत अनुपस्थित राहत असल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रशिक्षकेला सांगितले. दरम्यान, या प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी ग्रामसचिवांशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.
पार्डी ताड येथील ग्रामपंचायत कार्यालयात १३ मार्च रोजी सकाळी आमच गाव, आमचा विकास अभियानांतर्गत आले असता. ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप असल्याचे दिसले. यावेळी ग्रामसचिव पी. एस. मनवर यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्कही केला; परंतु ते उपस्थित झाले नाही. त्यामुळे आपणाला कार्यक्रम न घेताच परत यावे लागले.
-प्रतिभा गावंडे, प्रविण प्रशिक्षिका, पं. स. मंगरुळपीर.