लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने आणि बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणाला पसंती देत असल्याने कोविड केअर सेंटर ओस पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ सरकारी कोविड केअर सेंटर ओस पडले असून, अन्य चार सेंटरमध्ये १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने सरकारी कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या वाढविण्यात आली, तसेच खासगी कोविड हॉस्पिटललादेखील परवानगी देण्यात आली. ऑक्टोबरनंतर कोरोनाचा आलेख खाली येत आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत असले तरी बहुतांश रुग्ण हे गृहविलगीकरणाला पसंती देत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व दोन ग्रामीण रुग्णालयासह १६ सरकारी कोविड केअर सेंटर आहेत. यापैकी १२ कोविड केअर सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नाही, ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे. उर्वरित चार कोविड केअर सेंटरमध्ये १६ रुग्ण उपचारार्थ भरती आहेत. जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नसल्याने जिल्हावासीयांना तूर्तास दिलासा मिळत आहे.
कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांवर सोपविली अन्य जबाबदारीजिल्ह्यातील १२ कोविड केअर सेंटर ओस पडल्याने येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्य जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गावोगावी तपासणी मोहीम राबविणे, संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेणे, सर्वेक्षण व अन्य आरोग्यविषयक कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये सहा रुग्णजिल्ह्यात वाशिम शहरातील तीन आणि रिसोड येथील एक असे चार खासगी कोविड हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली होती. यापैकी वाशिम येथील एक हॉस्पिटल बंद करण्यात आले, तर अन्य दोन रुग्णालयांत सहा रुग्ण दाखल आहेत. रिसोड येथील रुग्णालयातही सध्या एकही रुग्ण नाही.
ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. जिल्ह्यातील १२ कोविड केअर सेंटरमध्ये सध्या एकही भरती नाही. मोठ्या संख्येने कोरोना बेड रिकामे आहेत. तथापि, कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. - डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी