वाशिम जिल्ह्याची अर्थव्यवस्था बहुतांशी शेती निगडित व्यवसायांवर अवलंबून असून, ७० टक्क्यांपेक्षा अधिक कामगारांचा उदरनिर्वाह हा शेतीच्या भरवशावरच चालतो. त्यामुळे खरीप हंगामानंतर रोजगाराची स्थिती गंभीर रूप धारण करते, तर रब्बी हंगामानंतर जिल्ह्यात रोजगार मिळणेच कठीण होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असून, एकूण ४९१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १६१ ग्रामपंचायतींतर्गत रोहयोची केवळ ४५४ कामे केली जात आहेत. या कामांवर २७८४ मजूर कार्यरत असून, त्यापैकी ६२ मजुरांची आधार नोंदणी झालेली नाही. अद्यापही जिल्ह्यातील हजारो कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत असून, त्यापैकी बहुतांश लोकांनी, तर रोजगारासाठी परजिल्ह्यात स्थलांतर सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-----
तालुकानिहाय रोहयोची कामे
तालुका ग्रामपंचायती कामे
मालेगाव ३५ - ८४
मं.पीर ३५ - १२४
कारंजा ३४ - ९६
रिसोड २७ - ४९
मानोरा १७ - ६८
वाशिम १३ - ३३
----------------------------
मानोरा, वाशिम तालुक्यातील स्थिती वाईट
जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतीत रोहयोची ४५४ कामे करण्यात येत असली तरी, वाशिम आणि मानोरा तालुक्यातील स्थिती त्यात अधिकच वाईट आहे. वाशिम तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींत केवळ ३३ कामे सुरू आहेत. तर आर्थिकदृष्ट्या जिल्ह्यात सर्वात मागास असलेल्या मानोरा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींत केवळ ६८ कामे सद्य:स्थितीत केली जात आहेत. या तालुक्यात रोजगाराची स्थिती सर्वात गंभीर असल्याने कामगारांकडून कामांची मागणी वाढली आहे.
------------
मजुरांचे स्थलांतर सुरू
जिल्ह्यात रब्बी हंगामातील कामे संपली असतानाच रोजगाराची समस्या गंभीर झाली असून, दरदिवशी विविध ठिकाणांहून शेकडो मजूर मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सद्य:स्थितीत वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयोची कामे वाढवितानाच त्यांना या कामाबाबत मार्गदर्शनही करणे आवश्यक आहे.
-----------