पपईवरील रिंग स्पॉट व्हायरस आणि मोझॅक हे विषाणूजन्य रोग आहेत. या रोगांमुळे पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगात पानावर पिवळसर चट्टे पडतात, शिरा मात्र हिरव्या राहतात, पाने आकसतात व पानाची तसेच झाडाची वाढ खुंटते. पानाच्या देठावर व खोडाच्या कोवळ्या भागावर तेलकट ठिपके दिसतात. फळधारणा कमी होते किंवा होत नाही. फळे न वाढता वाळून पडतात साधारणपणे पपईच्या झाडावर पहिली फळधारणा होते आणि फळांची वाढ होत असते त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. जिल्ह्यात पपईच्या पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ आर. एस. डवरे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. रिंग स्पॉट व्हायरस ची लक्षणे दिसून येताच रोगग्रस्त झाड उपटून ताबडतोब नष्ट करावे, या रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होत असल्यामुळे या किडीच्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निंबोळी तेल १०० ते १२५ मिलि अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी, असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डवरे यांनी केले आहे.
पपईवर रिंग स्पॉट व्हायरस, मोझॅकचा प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:41 AM