नाना देवळे लोकमत न्युज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील चकवा हे गाव पाणीदार व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून येथील राजकन्या मनवर या ६५ वर्षीय वयोवृद्ध आजीबाईने हातात कुदळ, फावडे घेऊन गावशिवारात शेततळ्याचे काम सुरू केले आहे. इतरांसाठी ही प्रेरणादायी बाब असून, राजकन्या मनवर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. दुष्काळाची झळ सोसणाºया राज्यातील गावात पाणी फाऊंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धा राबविली जात आहे. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील चकवा या गावाने सहभाग नोंदविला असून, येथील जलसाक्षरता अभियान जलदुत रवींद्र इंगोले यांनी एक प्रेरणादायी सभा घेतली. या सभेनंतर सुरुवातीला श्रमदान करण्यासाठी गावकºयांचा थोडासा प्रतिसाद मिळाला. मात्र अल्पावधीतच प्रभाव ओसरला. ४१६ लोकसंख्या असलेल्या या चकवा गावाला पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन गावातील राजकन्या मनवर यांनी माझं गाव पाणीदार व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून शेततळे खोलीकरणाचे काम करीत आहेत. यावर्षी उन्हाच्या तिव्रतेची तमा न बाळगता रखरखत्या उन्हात त्या दररोज तीन घंटे कुदळ, फावडे व सोबत पाण्याची छोटीशी घागर घेऊन शेततळ्याचे काम करीत आहेत. ही बाब तरुणाईला लाजविणारी ठरत आहे. अनेकजण स्वत: साठी काम करतात. पण मनवर यांनी स्वत:चे गाव पाणीदार व्हावं यासाठी उन्हातान्हात काम करीत आहेत. प्रत्येकाने नि:स्वार्थ भावनेने श्रमदान केल्यास गाव पाणीदार व्हायला फारसा वेळ लागणार नाही, असा आशावाद राजकन्या मनवर यांनी व्यक्त केला.