लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : सौभाग्यवती योजनेंतर्गत वीजजोडणी मिळालेल्या लाभार्थींनादेखील अव्वाच्या सव्वा विद्युत देयक आकारण्यात आल्याने विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा मानोराच्यावतीने १ आॅगस्ट रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर विद्युत देयकांची होळी केली.विजेचा दरात प्रचंड वाढ झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहे. विदर्भात सर्वाधिक विजेची निर्मिती होती. मात्र, विदर्भातील जनतेला महागडी विद्युत मिळते. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयक आकारले जात असल्याने याविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा मानोराच्यावतीने गुरूवारी आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले की, विज औद्योगीक केंद्र विदर्भात आहे. यासाठी विदर्भाच्या जमीनी गेल्या. त्यासाठी पाणी, कोळसा सुध्दा वापरण्यात येतो. तरीसुध्दा विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिवाय अधिभारमुळे जनता त्रस्त आहे. वाढलेले विजदर निम्यावर करा, कृषीपंपांचे विज बिल माफ करा व भारनियम थांबवा यासाठी विज देयकाची होळी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी कनिष्ठ अभियंता राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ.विठ्ठलराव घाडगे, प्रा. मोहन खुपसे, संतोष पुरी, शुभत तायडे, देहात्म कोल्हे, कैलास पवार, रामराव मिसाळ यांनी उपस्थिती होती. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, प्रधानमंत्री सौभाग्यवती योजनेंतर्गत कारखेडा येथे मिटर बसविण्यात आले. परंतु विज ग्राहकांना सात ते आठ हजार रुपये बिले प्राप्त होत असल्याने या योजनेंतर्गतच्या ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.
ग्राहकांना जादा वीज देयक : मानोरा येथे विद्युत देयकांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 4:50 PM