वाशिम : रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि डिस्चार्जनंतरही ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना वाहनांमध्येच ऑक्सिजनची व्यवस्था करून वाशिम येथील खासगी कोविड हॉस्पिटल येथे यावे लागत आहे. असाच एक रुग्ण सोमवार, दि. ३ मे रोजी एका खासगी कोविड हॉस्पिटल येथे ऑटोमध्ये ऑक्सिजन लावून आला असता, त्याला ऑटोमध्येच तपासण्यात आले. वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि मागणीच्या तुलनेत लस, ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांसह नातेवाइकांनादेखील गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांना २५ ते ३० दिवसांनंतरही ऑक्सिजनची गरज असल्याने आणि एवढ्या दिवस हॉस्पिटलमध्ये राहणे शक्य नसल्याने घरामध्ये ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली जाते. असाच एक रुग्ण डिस्चार्जनंतर ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलिंडर घेऊन वाशिम येथील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी आला असता, पायऱ्या चढताना रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून संबंधित डॉक्टरांनी ऑटोपर्यंत जाऊन त्या रुग्णाची तपासणी व उपचार केले. ऑटोमध्ये ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही झाली होती.(प्रतिनिधी
कोरोनाबाधित रुग्णाला ऑटोमध्येच लावले ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 11:04 AM