यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर कधी करायचा, याविषयी राज्यस्तरीय टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना सर्व खासगी डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. रेमडेसिविरच्या वापराबाबत प्रसारमाध्यमांनी सुद्धा जनजागृती करून या इंजेक्शनच्या वापराविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांवर अशा उपचाराची गरज असलेल्या रुग्णांनाच भरती करावे. तसेच रुग्णालयात खाटा शिल्लक असल्यास रुग्णांना परत न पाठविता त्यांच्यावर उपचार सुरु करण्याबाबत खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे. गतवर्षीप्रमाणे आताही अशा लोकांची वाहने जप्त करण्यात येणार असून संचारबंदी असेपर्यंत ही वाहने पोलीस ठाण्यात ठेवण्यात येतील. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुद्धा करण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, जिल्ह्यात सध्या ८ कोविड केअर सेंटरमध्ये ८९३ सर्वसाधारण खाटा उपलब्ध आहेत. तसेच शासकीय व खासगी कोविड हेल्थ सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये प्राणवायूची सुविधा असलेल्या ५२६ खाटा, ‘आयसीयू’च्या २१४ खाटा उपलब्ध असून ७७ व्हेंटिलेटर्स सुविधा उपलब्ध आहेत. यापैकी ऑक्सिजन बेडवर २८५ व व्हेंटिलेटर्सवर २१ रुग्ण आणि १६ रुग्ण आयसीयूमध्ये भरती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या काही दिवसात अजून काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचारासाठी मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
००
बाक्स ...
जिल्हा कोविड रुग्णालयात आणखी ७५ खाटा उपलब्ध होणार..
प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच जिल्हा कोविड रुग्णालयात आणखी ७५ खाटा उपलब्ध होणार आहेत. तसेच याठिकाणी ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’चे काम सुद्धा अंतिम टप्प्यात असून याद्वारे दैनंदिन २०० जम्बो सिलिंडर भरतील इतका प्राणवायू तयार होणार आहे. त्यामुळे प्राणवायू सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच जिल्हा कोविड रुग्णालयासाठी ७५ ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ आणि २५ बायपॅप मशीनची खरेदी करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले.