वाशिम : कोरोनामध्ये रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचे समोर येत असून, ऑक्सिजनचा मागणीप्रमाणे पुरवठा नाही. त्यामुळे उपचारादरम्यान विविध पद्धतींचा अवलंब केला जात असून, पालथे झोपून ऑक्सिजनची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. गृहविलगीकरणातील रुग्णांनीदेखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही वेळेसाठी पालथे झोपल्यास रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढू शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत आहे. रुग्णांना ऑक्सिजन लावण्याबरोबरच डाव्या व उजव्या बाजूने काही वेळेसाठी झोपणे, पालथे झोपवून ऑक्सिजन पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. घरच्या घरीदेखील ऑक्सिजन पातळी वाढविण्याचा हा प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्ण व इतरांना करता येतो. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषत: गृहविलगीकरणात असलेल्यांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो काही प्रमाणात कमी होतो. पाठ बेडवर टेकवून उताणे झोपलेल्या रुग्णाला हळुवारपणे पोटावर झोपविल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ऑक्सिजनेशन नीट व्हावे म्हणून पालथे झोपविणे या पद्धतीचा स्वीकार आधुनिक वैद्यकशास्त्राने केल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, तसेच रुग्ण जर गृहविलगीकरणात असेल, तर त्याच्या ऑक्सिजनच्या तपासणीबरोबरच तापमान, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी याची नियमित तपासणी केली जाते. रुग्णाला वेळेवर पालथे झोपविल्यास श्वसनास मदत होते. हा प्रयोग गृहविलगीकरणातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी प्राधान्याने करण्याचे आवाहनदेखील डॉक्टरांनी केले.
०००००००
असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन
पालथे झोपताना पोटाचा भाग रिकामा कसा राहील, याची दक्षता घेतली जाते. एक उशी छातीखाली, एक उशी कंबरेच्या समोरच्या भागाखाली ठेवण्यात येते. अर्था ते दोन तास पालथे व नंतर तेवढाच वेळ उजव्या कुशीवर झोपावे. नंतर अर्धा तास उठून बसावे व अर्धा तास ते दोन तास डाव्या कुशीवर झोपावे. नंतर पुन्हा पालथे झोपावे, अशा प्रकारे वारंवार स्थिती बदलणे उपयुक्त ठरते. हे दिवसातून अनेक वेळा करावे. आयसीयू तसेच घरी असलेल्या रुग्णांसाठीदेखील हा प्रकार फायद्याचा ठरतो.
----------------------------------
सर्क्युलेशनसाठी चांगली पद्धती
ऑक्सिजन सर्क्युलेशनसाठी पालथे झोपणे केव्हाही चांगले. जेवणानंतर कमीत कमी तासभर तरी पालथे झोपू नका. जोपर्यंत तुम्हाला सहन होईल, तोपर्यंतच पालथे झोपा. प्रत्येकाने क्षमतेप्रमाणे पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. गरोदर महिलांनी शक्यतोवर हा प्रयोग टाळावा.
-डॉ. वैभव गाभणे,
एम.डी. मेडिसिन, वाशिम
--------------------------------------
...असे होतील फायदे
शरीरातील ऑक्सिजनचा स्तर ९५ च्या पुढे असणे आवश्यक आहे; परंतु कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाचा ऑक्सिजनस्तर जर त्यापेक्षा कमी असेल, तर त्यांनी पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा स्तर चांगला वाढतो. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचीदेखील रुग्णालयात या प्रयोगाद्वारे ऑक्सिजन पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
- डॉ. सिद्धार्थ देवळे,
एम.डी. मेडिसिन, वाशिम
----------------------------------------------
...तर पालथे झोपू नये
गरोदर असलेल्या महिलांनी पालथे झोपू नये. पोटाचे विकार, मांडीचे हाड यांचे फ्रॅक्चर असलेले रुग्ण यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व रुग्णांसाठी ऑक्सिजन पातळी वाढविण्याकरिता पालथे झोपण्याची पद्धत फायदेशीर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा प्रयोग करावा.
-डॉ. अमित राठी,
एम.डी. मेडिसिन, वाशिम
............
एकूण रुग्ण ३०,०२१
रुग्णालयातील रुग्ण ९७०
गृहविलगीकरणातील रुग्ण ३,३८९