वाशिम : स्त्री रुग्णालय येथील जिल्हा कोविड रुग्णालय परिसरात ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ची उभारणी करण्यात येत असून, या प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २० एप्रिल रोजी जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट देऊन प्लान्ट उभारणीच्या कामाचा आढावा घेतला. तीन ते चार दिवसात हा प्लान्ट कार्यान्वित होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मडावी, डॉ. राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ची उभारणी पूर्ण झाल्यानंतर दर मिनिटाला २०० लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून, या प्लान्टमध्ये तयार होणारा ऑक्सिजन सेन्ट्रल लाइनद्वारे रुग्णांच्या बेडपर्यंत पोहोचविला जाणार आहे. या प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन ते तीन दिवसांत प्लान्ट कार्यान्वित होऊन प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. राठोड यांनी यावेळी दिली.
बाॅक्स
जिल्ह्यात आणखी दोन ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभारण्यात येणार
वाशिम येथील जिल्हा कोविड रुग्णालय परिसरात दर मिनिटाला २०० लिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमता असलेल्या ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत वाशिम येथील जिल्हा कोविड रुग्णालय व कारंजा येथील कोविड हेल्थ सेंटर परिसरात दर मिनिटाला ६०० लिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमता असलेले ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली. तसेच या दोन्ही प्लान्टची उभारणीसुद्धा लवकरात लवकर होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.