वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, त्या तुलनेत व मागणीनुसार वरिष्ठ स्तरावरून जिल्ह्याला ऑक्सिजन, रेमडेसिविर व लसीचा पुरवठा होत नसल्याचे दिसून येते. अजूनही ऑक्सिजन, रेमडेसिविर व लसीसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत असून, अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. राज्यात कोरोना संसर्ग सर्वत्रच वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिविर व लसीचा तुटवडाही जाणवत आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्याही सुटू शकला नाही. ऑक्सिजन, रेमडेसिविर व लसीसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ येत आहे.
००००
ऑक्सिजन : ३०० सिलिंडरची मागणी; मिळतात केवळ २१५
जिल्हा स्त्री रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय अशा दोन सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची मागणी ३०० असताना, केवळ २१५च्या आसपास मिळतात. गुरुवार, १५ एप्रिल रोजी जालना आणि अकोला येथूनही वेळेवर सिलिंडर न मिळाल्याने तारांबळ उडाली होती.
पुढे काय: वाशिम येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट साकारण्यात येत आहे.
०००००
रेमडेसिविर : मागणी २७०, इंजेक्शन मिळतात केवळ १२०
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचाही काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. जवळपास २७० इंजेक्शनची मागणी असताना, १२० इंजेक्शन मिळत आहेत.
पुढे काय : मागणीनुसार इंजेक्शन उपलब्ध कसे होतील, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
०००००
लसीकरण : मागणी ५० हजारांची; मिळाल्या २० हजार
जिल्ह्यात लसीच्या ५० हजार डोसची मागणी केली होती. प्रत्यक्षात तीन दिवसांपूर्वी २० हजार डोस मिळाले. शुक्रवारपर्यंत १९ हजार ४०० डोस संपले असून, आता केवळ ६०० डोस शिल्लक आहेत.
पुढे काय : लसीचे जवळपास ५ हजार डोस एक, दोन दिवसांत मिळतील, असा अंदाज आहे.
०००००
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन, तसेच लसीचा तुटवडा निर्माण होऊ नये, म्हणून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लसीचे २० हजार डोस मिळाले होते. ते संपत नाही, तोच आणखी पाच ते सहा हजार डोस एक, दोन दिवसांत मिळणार आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनसंदर्भात अन्न व प्रशासन विभागाकडून वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांनीदेखील आवश्यक ती काळजी घ्यावी.
-डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम