वाशिम : आजपर्यंत नागपूर येथून अकोला व वाशिमसाठी ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत होता. तथापि, नागपूर व अकोला येथे कोविडच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, नागपूर व अकोला येथील रुग्णांसाठी कृत्रीम ऑक्सिजन कमी पडत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. यामुळे वाशिम येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात येत असल्याचे अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत २ हजार ६८६ रुग्ण कोविड बाधित आहेत. यापैकी ५४ रुग्ण कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्यावर ठेवण्यात आलेले आहेत. जिल्ह्याची ऑक्सिजन साठवणुक क्षमता ५,१९७ क्युबिक मीटर एवढी आहे. यापैकी सद्या केवळ १,५३० क्युबिक मिटर एवढाच ऑक्सिजन साठा २ एप्रिल रोजी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्राकडुन प्राप्त झाली आहे. सद्यस्थितीत ५४ रुग्ण कृत्रिम ऑक्सिजन पुरवठावरील रुग्णांसोबतच इतर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा लागण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली, तर जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाल्याशिवाय राहणार नाही.
....................
कोट :
कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा नागपूर येथून बंद करण्यात आल्याचे अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी २८ मार्च रोजी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांना कळविले आहे.
डॉ.मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम