वाशिम येथे शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणारी विकासकामे करताना आवश्यक इच्छाशक्तीचा अभाव दिसत असल्याचे मत व्यक्त करत माजी आमदार जाधव पुढे म्हणाले की, स्थानिक अकोला नाका परिसरात प्लॅनेटोरियम, नाट्यगृह आणि टेम्पल गार्डनच्या विकासासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च होत आहेत. सन १९१५-१६ मध्ये मंजूर झालेली ही कामे सध्याही अपूर्णावस्थेत आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी पालिकेने तीन ते चार वेळा मुदतवाढही दिली. तरीही कामे अर्धवटच आहेत. असे असतानाही कंत्राटदाराची ९० टक्के देयके अदा करण्यात आली. वाशिम पालिकेकडून शहरवासीयांना खूप अपेक्षा होत्या; परंतु परिस्थिती खूप वेगळी आणि गंभीर आहे. अपूर्ण कामांबाबत पालिका प्रशासनाकडून कोरोनाचे कारण सांगितले जात असले तरी, ही अडचण अलीकडच्या एक वर्षातील आहे. त्यामुळे ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आधीचा कालावधी पुरेसा होता, असेही जाधव यांनी सांगीतले. शहर विकासाच्या मुद्यावर आता आम्ही पाऊल उचलले आहे. यामध्ये कुठलीही तडजोड राहणार नसून यापुढेही हा लढा सुरूच राहील, असेही शेवटी माजी विजय जाधव यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस प्रा. दिलीप जोशी, नगरसेवक अमित मानकर, बाळूभाऊ मुरकुटे, भीमकुमार जीवनाणी, धनंजय हेंद्रे, धनंजय रणखांब, योगेश सराफ, नितेश राठी, शिवशंकर भोयर, प्रदीप देशमुख उपस्थित होते.
--------------
कामे अंदाजपत्रकानुसार नसल्याचा युक्तिवाद
शहरातील विकासकामांचा दर्जा पाहता ही कोट्यवधींची कामे अंदाजपत्रकानुसार नाहीत, असा युक्तिवादही माजी आमदार जाधव यांनी केला, तसेच याबाबत आपले खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक यांच्याशी बोलणे झाले. त्यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, करून यासंदर्भात आपण सचिव पातळीवर चौकशी लावणार असल्याचे सांगितल्याचे विजय जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.