सध्या वाईगौळ परिसरात सर्वत्र तूर मळणीयंत्रातून काढून घेण्याच्या कामास गती आली आहे. गावातील आशा एकनाथ जाधव ही शेतकरी महिला तिच्या शेतात कापणी करून ठेवलेली तूर मळणीयंत्रामधून काढत असताना अचानक साडीचा पदर यंत्रात अडकून आशा ओढल्या गेल्या. यामुळे त्यांच्या गळ्याला फास लागून जीव धोक्यात सापडला. याप्रसंगी मळणी यंत्रचालक सुरेश जाधव यांनी समयसूचकता दाखवून जवळ असलेल्या विळ्याने साडीचा पदर कापून टाकल्याने आशा जाधव यांचा जीव बचावला; मात्र गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी दिग्रस (जि. यवतमाळ) येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.
...............
बॉक्स :
शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे
मानोरा तालुक्यात सध्या तूर काढणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. पारंपरिक पद्धतीने तूर काढणी प्रक्रिया इतिहासजमा झाली असून सर्वच शेतकरी आता यंत्राचा आधार घेत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात होऊन शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागले. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे ठरत असल्याचा सूर उमटत आहे.