वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाने सर्वसामान्यांसोबतच प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनाही हैराण केले. गेल्या वर्षभरात विविध विभागांतर्गत कार्यरत हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. पोलीस विभागही त्यास अपवाद राहिला नाही. २३ मार्च २०२० ते ५ जून २०२१ या १५ महिन्यांच्या कालावधीत ३० अधिकारी व ३३१ अंमलदार अशा एकूण ३६१ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील एका अंमलदाराचा मृत्यूदेखील झाला. आता मात्र हा विभाग कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असून सध्या केवळ एक कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत असून इतर सहा कर्मचारी गृहविलगीकरणात आहेत.
जिल्ह्यात साधारणत: मार्च/एप्रिल २०२० पासून कोरोना संकटाला सुरुवात झाली. संसर्गाच्या पहिल्या लाटेत परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात होती. मात्र, १५ फेब्रुवारी २०२१ नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये महावितरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह त्यांच्या अधीनस्त असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली. संसर्गाच्या पहिल्या लाटेत २३ मार्च २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पोलीस विभागातील ३० अधिकारी व १०० कर्मचारी असे एकंदरीत १३० जण बाधित झाले. त्यापैकी एका अंमलदाराचा मृत्यू झाला; तर १५ फेब्रुवारी ते ५ जून २०२१ या कालावधीत संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १४ अधिकारी व २१७ कर्मचारी असे एकूण २३१ जण बाधित झाले. सुदैवाने त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. सध्या केवळ एक जण रुग्णालयात; तर सहा जण गृहविलगीकरणात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली.
.....................
१३०
पहिल्या लाटेत बाधित पोलीस कर्मचारी
०१
संसर्गाने झालेले मृत्यू
२३१
दुसऱ्या लाटेत बाधित पोलीस कर्मचारी
००
संसर्गाने झालेले मृत्यू
२५४
एकूण बरे झालेले कर्मचारी
................
कोट :
गेल्या १५ महिन्यांच्या कालावधीत पोलीस दलातील ३० अधिकारी व ३३१ अंमलदारांना कोरोनाची बाधा झाली. एका अंमलदाराचा मृत्यूदेखील झाला. आता मात्र परिस्थिती बहुतांशी नियंत्रणात आहे. ३५४ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या केवळ एक कर्मचारी रुग्णालयात, तर सहा कर्मचारी गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम