वाशिम : तालुक्यातील दगड उमरा येथील पाणंद रस्त्याची अवस्था गेल्या ३० वर्षांपासून अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतात विविध कामांसाठी वाहने, बैलगाडी घेऊन जाणे कठीण झाले असून प्रशासनाकडे मागणी करूनही हा प्रश्न निकाली निघाला नाही.
खरीप हंगामात विविध शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशक, तणनाशकांसह शेतीअवजारे न्यावी लागत आहेत. तथापि, बहुतांश पाणंद रस्त्यांवर चिखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलमय पाणंद रस्त्याने ये-जा करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील पाणंद रस्त्याची अवस्था गेल्या ३० वर्षांपासून अत्यंत वाईट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तिन्ही ऋतूत शेतात वाहने घेऊन जाणे अडचणीचे ठरत आहे. या रस्त्याचे काम करण्याची तसदी घेण्यात येत नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत.
-----------
मंजुरी मिळूनही कामे प्रलंबित
साधारण चार वर्षांपूर्वी महसूल विभागातर्फे पाणंद रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर वाशिम तालुक्यातील इतर भागातील पाणंद रस्ते संदर्भात रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे पाणंद रस्त्यांची कामे थांबविण्यात आली होती. काही दिवसांनी ही कामे सुरू करण्यात आली. मात्र, दगड उमरा परिसरातील रस्त्याच्या कामांना मुहूर्त मिळाला नाही.
^^^^^^^^^^^^